दौंड, (पुणे) : ‘चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस’च्या वातानुकूलित डब्यात प्रवासी झोपेत असताना त्याची आठ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचा ऐवज असलेली बॅग चोरीस गेल्याची घटना घडली. या बॅगमध्ये सोन्याच्या दागिन्यांसह एक किलो चांदी असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी राहुल शेषराम (वय २६, रा. कांचीपुरम, चेन्नई, तमिळनाडू) यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांत तक्रार दिली आहे.
दौंड लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल शेषराम हे चेन्नई एक्स्प्रेसने चेन्नई ते पुणे असा प्रवास करत होते. ‘एम ७’ या वातानुकूलित डब्यात २० मार्च रोजी जिंती (जि. सोलापूर) ते मलठण (ता. दौंड) रेल्वेस्थानकांच्या दरम्यान त्यांच्याकडील दोन बॅगांपैकी एक लाल रंगाची ट्रॉली बॅग चोरीस गेली. दौंड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्यांना बॅग चोरीस गेल्याचे लक्षात आले.
दरम्यान, या बॅगमध्ये साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदी, असा एकूण ८ लाख १० हजार रुपयांचा ऐवज होता. राहुल शेषराम यांनी याबाबत पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर हा गुन्हा दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग केला आहे.