पुणे : जपानी कला, संस्कृती आणि कारागिरी याचा त्रिवेणी संगम असलेले ‘लँडस्केप अँड लिजेंड्सः ए जपानी कल्चर मोझॅक’ सांस्कृतिक प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण कला दालनात गेट सेट गोच्या वतीने २७ ते २९ ‘ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
छायाचित्रकार किरण जोशी यांची जपानमधील अदभूत निसर्गरम्य स्थळांची व तेथील वन्यजीवांची छायाचित्रे, तर चित्रकार आसावरी अरगडे यांची जपानी कलांचे नाजूक व सुसंवादी दर्शन घडवणारी चित्रे या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. या व्यतिरिक्त, उपस्थितांसाठी जपानी स्मृतीचिन्ह, पारंपरिक बाहुल्या आणि हस्तकला, संस्कृतीशी संबंधित अन्य सुंदर वस्तू पाहण्याची संधी आहे.
राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी हिताची अस्तिमो कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जुनरो उत्सुमी सान आणि संचालक सुधीर गोगटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. ‘गेट सेट गो’चे संचालक अस्मी कुलकर्णी, गायिका मनीषा निश्चल यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.
या प्रदर्शनात जपानमधील निसर्गसंपन्न लैंडस्केप फोटोग्राफी, जपानमधील आगळीवेगळी वाइल्डलाईफ फोटोग्राफी, जपानमधील वेगवेगळ्या ठिकाणाचे वाॅटर कलरने केलेली कॅनव्हास पेंटिंग्ज, जपानची प्रसिद्ध ओरिगामी आणि त्याची प्रात्यक्षिके, जपानहून आणलेल्या वेगवेगळ्या वस्तू, जपानमधील जगप्रसिद्ध सुंदर सुंदर बाहुल्या, जपानी कला, संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तू आदी गोष्टी पहायला मिळणार आहेत.