केडगाव : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय असलेल्या याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारित करून देण्यात आलेला आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा मतदाराची नोंदणी करणे या अनुषंगाने प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार अरूण शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ विद्यालय, खुटबाव ता. दौंड येथे विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. (दि. 17 व 18 ऑगस्ट) पर्यंत हे शिबीर सुरू राहणार आहे. या शिबीरामध्ये आज खुटबाव गावातील ग्रामस्थांनी मतदान कार्ड मध्ये नावात दुरुस्ती, फोटोमध्ये बदल, जन्मतारखेत बदल तसेच नवीन मतदार नोंदणीचा लाभ घेतला. अशी माहिती बीएलओ शाम कदम यांनी दिली.
सदर शिबीरास सहा.गट विकास अधिकारी शितल बुलबुले व बीएलओ सुपरवायझर अतुलकुमार खताळ यांनी भेट दिली. या शिबीरास रमेश फणसे, गणेश जाधव व नेहा भागवत यांनी सहकार्य केले.
मतदान केंद्रांच्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या या विशेष शिबीरांमध्ये 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होवून उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व आपल्या नावाची मतदार म्हणून नोंदणी करुन घ्यावी. जेणेकरून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क, अधिकार बजावता येईल.
– अरुण शेलार, तहसिलदार- दौंड