-संतोष पवार
पळसदेव : निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात महिला आणि मुलींसह बालकांवर होणाऱ्या हिंसा अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंध, प्रतिसाद, पुनर्वसन आणि सुधारणा या चार टप्प्यांवर गावपातळीवर काम केले जाते. याच अनुषगांने निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने ‘जागतिक महिला हिंसाचार विरोधी’ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. 25 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक महिला हिंसाचार निर्मूलन दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात महिला हिंसाचार विरोधी अभियानानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही वर्षात मुलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था कटीबद्ध आहे. बाल मजुरी, बाल विवाह, विधीसंघर्षग्रस्त मुलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पालक आणि मुलांमध्ये सातत्याने एक तणाव निर्माण होताना दिसतोय, मुलांवर होणारे शारीरिक व लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढत आहे. छेडछाड, व्यसनाधीनता सारख्या समस्या दिसून येतात, तसेच मुलांसोबतची क्रूर वागणूक म्हणजे मुलांना मारहाण करणे.
दरवर्षी जागतिक महिला हिंसाचार विरोधी पंधरवडाच्या निमित्ताने 16 दिवस निर्माण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या 7 वर्षापासून पुणे जिल्ह्यात हे 16 दिवसाचे अभियान राबवत आहेत. या वर्षाची थीम आहे,”महिला आणि मुलींवरील हिंसाचार संपवण्यासाठी संघटित व्हा” या थीमला घेऊन 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 रोजी हे अभियान राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम, फिल्म शो, पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य सादरीकरण, प्रशिक्षण, चर्चासत्र, रॅली आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पळसनाथ विद्यालयात शालेय विद्यार्थीनींना याबाबत उद्बोधन करण्यात आले.
यावेळी पळसनाथ विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव, वृषाली काळे, सुवर्णा नायकवाडी, प्रतिभा कांबळे, उज्ज्वला वाघमारे, निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेचे प्रतिनिधी रवी पवार, किरण यादव, माधुरी खैरकर आदिंसह शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते.