राहुलकुमार अवचट
यवत – श्री सम्मेद शिखरजी जैन धर्मियांचे अतिशय पवित्र स्थान असलेले सिद्धक्षेत्र जि, गिरडीह ( झारखंड) येथे पर्यटन क्षेत्र जाहीर केल्याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी यवत येथे जैन समाजाने व्यवहार बंद ठेवून मुक मोर्चाचे आयोजन केले होते.
जैन धर्मियांचे २४ तीर्थकरांपैकी २० तीर्थकर ज्या पवित्र भूमीत मोक्षाला गेले अशा झारखंड राज्यातील मधुबन (जिल्हा गिरडीह) येथील महा पर्वतराज श्री सम्मेद शिखरजी क्षेत्र झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने त्या ठिकाणी हॉटेल व बार व इतर गोष्टी सुरू होतील की ज्या अहिंसा तत्वाच्या एकदम विरोधी असु शकतात.
जागतिक पातळीवर जैन समाज हा शांतीप्रिय समाज असुन समाजातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी श्री सम्मेद शिखरजी येथे जाऊन २० तीर्थकर पवित्र मोक्ष भूमीवर पहाड वंदन अनवाणी करण्याची इच्छा बाळगतो.
परंतु, सरकारच्या निर्णयामुळे जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र भूमीचे पावित्र्य धोकात आले असून जैन समाजाची अस्मितेवर घालायचा हा प्रयत्न आहे. या निर्णयामुळे देशभरातील सकल जैन समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून या निर्णयाचा निषेध नोंदविला.
याबाबत निवेदन यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार व सरपंच समीर दोरगे व उपसरपंच सुभाष यादव यांना देण्यात आले.