पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) १४ ते २२ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’तर्फे ११ डिसेंबर रोजी वाचन तास उपक्रम राबविण्यात येणार आहे. वाचन चळवळीला बळ मिळावे आणि वाचनासंदर्भातील जागरूकता वाढीस लागावी, या उद्देशाने ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम बुधवारी दुपारी बारा ते एक या वेळात होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फर्ग्युसन महाविद्यालायाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवातील या उपक्रमाला गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये हजारो पुणेकरांनी सहभाग घेऊन वाचन चळवळीला मोठे पाठबळ दिले होते. यावर्षीही हजारोंच्या संख्येने पुणेकर यामध्ये सहभागी होतील या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे.
पुणे शहरातील सर्व विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्था या सर्वांना यामध्ये सामावून घेण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरातील सर्व रुग्णालये, सार्वजनिक गणेश मंडळे, ग्रंथालये, सर्व शासकीय कार्यालये, खासगी आणि सरकारी आस्थापने तसेच पुणे शहरातील सर्व मोठे चौक, कलाकार कट्टा, पर्वती, शनिवार वाडा, सारसबाग यांसह सर्व ऐतिहासिक स्थळांवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी रविवारी दिली.
या उपक्रमात सहभागी कसे व्हाल?
या उपक्रमातील सहभागाचे छायाचित्र पाठविण्यासाठी तसेच कुठे आणि कोणते पुस्तक वाचले याची माहिती पाठविण्यासाठी https:// pbf24. in/register ही लिक आणि क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. यावर माहिती पाठविणाऱ्यांना ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी या भव्य उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पांडे यांच्याकडून करण्यात आले आहे.