इंदापूर : सोनाई प्रतिष्ठानच्यावतीने ऑगस्ट महिन्यात सर्वधर्मीयांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून (दि. 5) ऑगस्टपर्यंत त्यासाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य व सोनाई प्रतिष्ठानचे प्रमुख प्रवीण माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रवीण माने म्हणाले की, अस्मानी- सुलतानी संकटांमुळे शेतकरी व वाढत्या महागाईमुळे सामान्य लोकांना आर्थिक संकटाशी सामना करावा लागतो. आपल्या मुला- मुलींच्या लग्नाचा खर्च अधिक संकटात टाकतो. कर्ज काढावे लागते. ते फेडता आले नाही तर आत्महत्यासारखी प्रकरणे घडतात. एका शेतकऱ्याची वा सामान्यांची आत्महत्या संपूर्ण कुटुंबाच्या वाताहतीस कारणीभूत ठरते. त्यामुळे अशा घटना घडू नयेत म्हणून सन 2018 मध्ये सामुदायिक सर्वधर्मीयांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय सोनाई प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आला होता.
त्यावर्षी 74 विवाह लावून देण्यात आले होते. प्रत्येक धर्माच्या रितीरीवाजांप्रमाणे अगदी कौटुंबिक जिव्हाळ्याने तो विवाह सोहळा संपन्न झाला होता. वधूच्या सोन्याच्या मंगळसूत्रासह नवविवाहित दाम्पत्याला कपड्यांपासून चमच्यापर्यंतचे सर्व संसारोपयोगी साहित्य दिले होते.
शरद पवार आमचे दैवत !
प्रवीण माने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात परतणार असल्याची चर्चा आहे. पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत आगामी काळात प्रवीण माने आमच्याबरोबर दिसतील, असे विधान केले होते. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रवीण माने म्हणाले की, शरद पवार, खा. सुप्रिया सुळे कालही आमचे दैवत होते. आजही आहेत, उद्याही असणार आहेत. राजकीय परिस्थिती स्थिर राहत नाही. लोकांच्या मनात काय आहे, त्यावर सारे अवलंबून असते. आपण ज्या ठिकाणी असतो येथे प्रामाणिकपणे कार्य करतो, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.