तळेगाव ढमढेरे, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील तळेगाव रस्त्यालगत महालक्ष्मीनगर परिसरात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी २३ फेब्रुवारीला छापा टाकला. या टाकलेल्या छाप्यात अफूची तब्बल १ हजार २२६ झाडे जप्त करण्यात आली आहेत. तसेच अफूची लागवड करणाऱ्या एका पुरुषासह एका महिलेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सुशील शिवाजीराव ढमढेरे (वय ३८) व सत्यभामा सुरेश थोरात (वय ५५, रा. महालक्ष्मीनगर, शिक्रापूर, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शिक्रापूर येथील महालक्ष्मीनगर परिसरात एका व्यक्तीने शेतात, तर एका महिलेने घराशेजारी मोकळ्या जागेत अफूच्या झाडांची लागवड केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, पोलिस नाईक रोहिदास पारखे, किशोर शिवणकर, गीता बराटे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या वेळी सुशील ढमढेरे याने त्याच्या शेतातील लसणाच्या वाफ्यामध्ये अफूच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, पोलिसांनी या ठिकाणाहून अफूची ६६ झाडे जप्त केली. त्यानंतर सत्यभामा थोरात यांच्या घराची पाहणी केली असता घराशेजारीच मोकळ्या जागेत तब्बल १ हजार १६० अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. पोलिसांनी ही सर्व झाडे जप्त केली आहेत. पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे पुढील तपास करत आहेत.