विजय लोखंडे
वाघोली : विकास कामे ही दर्जेदार झाले पाहिजेत, एक आमदार सर्व ठिकाणी फिरून त्या कामांवर लक्ष देवू शकत नाही. त्यामुळे माझा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील एक आमदराच आहे आणि त्यानी विकास कामांवर लक्ष दिले पाहिजे. हा रस्ता माझा स्वतःचा आहे, असे समजून सर्वसामान्य कार्यकर्त्याने कामाची गुणवत्ता पडताळणे गरजेचे आहे. कामाची गुणवत्ता दर्जेदार नसेल तर तो सामान्य कार्यकर्ता देखील ते काम थांबवू शकतो, असे आवाहन आमदार अशोक पवार यांनी केले.
पेरणे (ता. हवेली) येथील चौफुला परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या लोणीकंद ते डोंगर गाव, डोंगरगाव ते वारघडे वस्ती, बकोरी या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुभारंभ आज नुकतेच शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार अशोक पवार बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) चे प्रदेश सरचिटणीस प्रदिप वसंत कंद, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे हवेली तालुकाध्यक्ष संदिप गोते, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षा शिवांजली वाळके, खरेदी विक्री संघाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब माने, पेरणेचे माजी सरपंच अण्णासाहेब टुले, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) चे जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ वाळके, तुळापुरचे माजी सरपंच गणेश पुजारी, बकोरीचे माजी सरपंच सत्यवान गायकवाड, जेष्ठ नेते दादासाहेब वाळके, पेरणे माजी उपसरपंच चांगदेव कोळपे तसेच अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार अशोक पवार यांनी या रस्त्यांच्या कामांच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षापासून रखडलेले रस्त्याचे काम सुरू होत आहे. लोणीकंद भागातील लोकप्रतिनिधी यांनी याआधी हे रस्ते दर्जेदार करून घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. ते प्रयत्न आमदार अशोक पवार यांनी करून लोणीकंद, पेरणे, डोंगरगाव, बकोरी परिसरातील जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे.
– प्रदिप वसंत कंद, प्रदेश वरिष्ठ सरचिटणीस-राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट