पुणे : पुण्यात बोगस शाळांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. ईरा एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल या अनधिकृत शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी चिंचवड येथील ऑर्चिड स्कुलवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर आता पुण्यातील उंड्री येथील शाळेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाळेकडे शासनाची मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश देत फी वसुल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी ज्ञानदेव आबाजी खोसे (वय-५५ रा. श्रीगणेश सोसायटी, वाघोली) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून उंड्री येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्ष जे डीकोस्टा (रा. बेंगलोर), संचालक समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे), मुख्याध्यापीका अनिता नायर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै २०२४ पासून संशयित आरोपींची सरकारने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पूर्तता न करता ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल सुरू ठेवले आहे. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे अनधिकृत वर्ग सुरु केले. हे वर्ग सुरु करण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नाही.
तसेच शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच विद्यार्थ्यांचे दाखले आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.