पुणे : आता मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना विधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र आहेत का? याविषयी शिक्षण क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविणारऱ्या राज्य सीईटी सेलने याबाबत औरंगाबाद खंडपीठाचा आदेश प्रसिद्ध करत मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ३ वर्षीय विधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे काम सुरु आहे. यामध्ये विधी अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यापूर्वी प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीसाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. सीईटीची परीक्षा दिल्याशिवाय संबंधित अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करता येत नाही. सध्या सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून ३ वर्षीय विधी अभ्यासक्रम सीईटीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे, अशा सर्व विध्यार्थ्यांना विधी तीन वर्षे या अभ्यासक्रमासाठीच्या सीईटी आणि प्रवेशासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामधील औरंगाबाद २०२१ च्या आदेशानुसार या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलने दिली आहे.