पुणे : एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नोलॉजी विद्यापीठाच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव असणाऱ्या “कारी-२०२४” ला घोले रोड, शिवाजीनगर येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे मंगळवारी (ता. १६) प्रारंभ झाला.
”कारी” म्हणजे ‘कलाकृती’, आणि चार दिवस चालणाऱ्या कला महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अप्रतिम कलाकृती सर्वांना पाहण्यासाठी खुल्या असणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राममंदीर प्रतिकृतीचे पूजन व दीपप्रज्वलन द्वारे पार पडले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलाकृती लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते तर प्रसिद्ध वास्तुविशारद ऋषीकेश कुलकर्णी व गिरीश दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी चंद्रमोहन कुलकर्णी म्हणाले की, कित्येक दिवसांपासून माझी ललित कला, पर फॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिजाइन आणि आर्किटेक्चर या सर्व गोष्टी एकाच छताखाली पाहण्याची इच्छा होती, ती आज ‘कारी’च्या माध्यमातून पूर्ण होत आहे. खरंतर कला ही कुठल्याही व्यक्तिच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा असा भाग असते. कला ही मानसाला आनंदाने जीवन जगण्याची प्रेरणा देत असते. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देत, कलाभिमूख शिक्षणाकडे ‘एमआयटी एडीटी’चा असणारा भर नक्कीच उल्लेखनीय आहे.
दरम्यान. यावेळी बोलताना ऋषीकेश कुलकर्णी व गिरीश दोशी यांनी देखील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाअविष्कारांचे भरभरून कौतुक करताना, पुणे शहरातील रसिकांनी याचा लाभा घ्यावा असे आवाहन केले. तीन दिवस चालणाऱ्या ‘कारी’ या कला उत्सवाची सांगता शनिवारी (२० एप्रिल) होणार असून, तत्पूर्वी, पुणे शहरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, डॉ.मिलिंद ढोबळे, डॉ.अश्विनी पेठे, डॉ.नचिकेत ठाकूर, डॉ.आनंद बेल्हे, डॉ.विरेंद्र शेटे, प्रा.प्रसाद निकुंभ, डॉ. तुषार पंके आदी मान्यवर उपस्थित होते.
वासुदेव कामत यांना विश्वारंभ कला पुरस्कार
‘कारी-२०२४’ उत्सवानिमित्त शुक्रवार (ता.१९) एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चित्रकलेतील बहुमुल्य योगदानाबद्दल जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांचा प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते विश्वारंभ कला पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, आदिनाथ मंगेशकर, कार्यकारी संचालक ज्योती ढाकणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उद्घाटन समारंभापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ.ढोबळे व डॉ.पेठे यांनी दिली आहे.