भिगवण : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मदनवाडी (ता. इंदापूर) येथील आनंद हॉटेलवर भिगवण पोलिसांनी छापा टाकून खुलेआम चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा नुकताच पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत ३ मुलींना सुटका केली आहे. तर भिगवण पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेलमालक नामदेव बाळासो बंडगर, अमित तानाजी भाकरे (दोघे रा. मदनवाडी, ता. इंदापूर), रोहित अंकुश निकम (रा. उद्धट), गजानन लक्ष्मण ठाकूर (रा. आनंद हॉटेल), मुंगाजी उर्फ पिंटू आवरगड (रा. भिगवण, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी हद्दीतील आनंद हॉटेलवर राजरोसपणे वेश्याव्यवसाय सुरु आहे, अशी माहिती भिगवण पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, त्याठिकाणी तीन महिला वेश्याव्यवसाय करीत असल्याचे आढळून आले.
दरम्यान, या प्रकरणी हॉटेल मालकासह ५ स्त्रिया व मुलींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर करीत आहेत.
ही कारवाई परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश बावकर, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, युवराज घोडके, पोलीस अंमदालर दत्तू जाधव, रणजीत मुळीक, अंकुश माने, आप्पा दराडे, नारायण बाळके, डी. एल. इंगोले, डी. एस. जाधव, महिला पोलीस अंमलदार सारीका जाधव यांच्या पथकाने केली आहे.