संदीप बोडके

लोणी काळभोर, (पुणे) : ऑनलाईन दाखल्यांचा सर्व्हर बंद असल्याने अपर तहसील लोणी काळभोर कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले वेटींगवर राहिल्याने ऑनलाईनची सेवा कोलमडली आहे. ऑनलाईन दाखल्यांसाठी राज्य सरकारचे कार्यरत असलेले संकेतस्थळ 26 मे ते 3 जून पर्यंत बंद ठेवल्याने हा सावळा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले अद्याप न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.

वाघोली मंडल अधिकारी, लोणीकंद मंडल अधिकारी, उरुळी कांचन मंडल अधिकारी, अष्टापूर मंडल अधिकारी, थेऊर मंडल अधिकारी तसेच लोणी काळभोर मंडल अधिकारी या कार्यक्षेत्रातील महसूली गावांमधील ऑनलाईन दाखल्यांची सेवा बंद पडल्याने हजारो विद्यार्थी व पालक मेटाकुटीला आले आहेत.

महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेअर इत्यादी दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र दाखल्यांची संकेतस्थळाचा सर्व्हर बंद असल्याने महा ई सेवा केंद्र चालक हतबल झाले आहेत. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेच्या आगतिकेतून विद्यार्थी व पालकांच्या रोषाचा सामना महा ई सेवा केंद्र चालकांना करावा लागत आहे. दाखले वेटींगवर प्रलंबित राहत असल्याने पालक व सेतू चालक यांच्यात खटके उडत आहेत.
दरम्यान, महा ई सेवा केंद्रांमधील गैरव्यवहार व अनागोंदी कारभार रोखण्यासाठी प्रशासनाने एका केंद्रावर एकाच लॉगीनमधून काम करण्यास परवानगी दिली आहे. पूर्वी एका सेतूच्या लॉगिनवरुन दोन किंवा तीन ठिकाणांवर काम केले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सेतू चालकांना शिस्त लावण्यासाठी शासनाने एका केंद्रावर एकाच लॉगीनवरून दाखल्यांचे काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यातच महाआयटी ने दाखल्यांचे संकेतस्थळ 3 जूनपर्यंत बंद असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दाखल्यांच्या कामांसाठी पालकांना अजूनही प्रतिक्षा करावी लागणार आहे.
याबाबत बोलताना लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते म्हणाल्या, “ऑनलाईन दाखल्यांचा सर्व्हर बंद आहे याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे. दाखले मिळत नसल्याने पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला लेखी अर्ज देण्यात आले असून लवकरच संकेतस्थळ सुरु होतील.







