पुणे : विधानसभा निवडणुका झाल्या की कांद्याचे भाव गडगडू लागले आहेत. हळवी कांद्याचा सुरू झालेला हंगाम आणि हवामान विभागाने वर्तविलेली पावसाची शक्यता यामुळे पुणे शहरातील बाजारपेठांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी पडल्याने आठवडाभरात कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत.
घाऊक बाजारात कांदा १५ ते ३० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात कांदा ३० ते ७० रुपये किलो दराने उपलब्ध झाला आहे. यामुळे देशभरातील शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत. मात्र, महागाईतून गृहिणीवर्गाला दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. डिसेंबरच्या सुरवातीपासून लाल हळवी कांद्याचा हंगाम सुरू असल्याने बाजारात चांगल्या प्रमाणात कांदा दाखल आहे.
मागील आठवड्यात दररोज ५० ते ६० ट्रकमधून होणारी आवक मागील तीन दिवसांपासून दररोज ८० ते १०० ट्रकवर गेली आहे. आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सध्या कांद्याला काय दर मिळतो याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांदा दर
- अहिल्यानगर : अहिल्यानगर एपीएमसी मध्ये आज लाल कांद्याला किमान 400, कमाल 2950 आणि सरासरी 1975 असा भाव मिळाला.
- छत्रपती संभाजी नगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळाले. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 500 कमाल, 2500 आणि सरासरी 1500 असा भाव मिळाला.
- सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या बाजारपेठेत आज कांद्याला सर्वाधिक कमी सरासरी भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 200, कमाल 2110 आणि सरासरी 1500 असा भाव मिळाला आहे.
- पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण या ठिकाणी कांद्याला किमान 1100, कमाल 3210 आणि सरासरी 2200 असा भाव मिळाला.