युनूस तांबोळी
शिरूर (पुणे) : हवामान बदलाचा फटका पुणे जिल्ह्यातील कांदा पिकाला बसत आहे. मागील काही काळापासून दरवर्षी अवकाळीचे संकट कांदा पिकावर आहे. यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
हवामान बदलाचा फटका पुणे जिल्ह्यातील कांदा पिकाला बसत आहे. मागील काही काळापासून दरवर्षी अवकाळीचे संकट कांदा पिकावर आहे. यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
पर्जन्यमान पाहिले असता वार्षिक सरासरी पर्जन्यामध्ये फारसा बदल झाला नसून, सरासरी तापमानात मात्र वाढ झाली आहे. सातत्याने अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. कुठे गारपिटीने शेतकऱ्यांना शेतमालाच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम पुणे जिल्ह्यातील कांदा पिकावर होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात गारवा जातीचा कांदा पिकविण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. मागील काही वर्षांत कांदा लागवडीत खूप मोठी वाढ झाली आहे. त्यातून कांदा पिकाच्या भाववाढीवर परिणाम पहावयास मिळत आहे. कांदा पिकाच्या उत्पादनावर राजकीय गणीत देखील हलताना पहावयास मिळत आहे. कधी तरी लॅाटरी लागल्याप्रमाणे कांद्याला भाव मिळाला तर रातोरात शेतकरी श्रीमंत होतो. तर कधी कांदा दर पडले तर उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यातून शेतकरी अश्रु ढाळताना पहावयास मिळतो.
नशीबावर हवाला ठेवून कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, राजगुरूनगर, जुन्नर यासह अनेक तालुक्यात कांद्याचे उत्पादन हमखास घेतले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शेतमाल उत्पादनाबाबत पहाणी केली असता गेल्या १० ते १५ वर्षांत कांदा पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत.
कमी कालावधीत कमी खर्चात निघणारे पीक म्हणून कांद्याची लागवड केली जात आहे. कांदा लावून त्वरीत फायदा मिळवणे हा कांदा लागवडीमागील हेतू असावा. हवामान बदलाविषयी योग्य ती माहिती न मिळणे, पेरणीच्या वेळी हवामान अंदाज गृहित न धरणे, किडीचे वाढते प्रमाण व त्यासाठी फवारण्यात येणाऱ्या औषधांवरील वाढता खर्च यामुळे कांदा उत्पादन घेणे अधिक खर्चाचे झाले आहे.
कांद्याचा दर्जा घसरण्याची कारणे…
* माती परिक्षण न करता अंदाजे दिली जाणारी रासायनिक खते.
* प्रजातीची लागवड करताना कृषी विभागाचा सल्ला न घेणे, त्यातून ठराविक प्रजातीची लागवड करणे.
* पुरेसा पाऊस नसल्याने विहिरीच्या पाण्याचा वापर करणे.
* किडीमुळे उत्पादीत कांद्याची गुणवत्ता कमी होणे.
* सेंद्रीय खतांऐवजी रासायनिक खतांचा वापर करणे.
कृषी विभागाचा सल्ला आवश्यक
कोणत्याही शेतमालाचे उत्पादन करत असताना हवामानाचा अंदाज घेणे महत्त्वाचे असते. निकृष्ट दर्जाच्या कांद्याला भाव न मिळणे, कांदा साठवणूकीची सोय नसणे, खरीप हंगामात अतिवृष्टी, गारपीट व हवामान बदल यामुळे कांदा पिकांच्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेऊन हवामान बदलाविषयी माहिती घेऊन पिकाचे उत्पादन घेणे आवश्यक आहे.
– अशोक जाधव, कृषी सहाय्यक
आर्थिक नुकसानीची झळ
कांदा उत्पादन घेत असताना हवामानाचा परिणाम महत्वाचा असतो. कांदा लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत हवामानाचा परिणाम जाणवत असतो. धुके, दुलई यामुळे लवकर फवारणी करावी लागते. त्यातून उत्पादन खर्च वाढतो. कधी कधी निकृष्ट दर्जाच्या कांद्याचे उत्पादन होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागते.
– आनंद शिंदे, शेतकरी, जांबूत