-बापू मुळीक
सासवड : नायगाव (ता. पुरंदर) परिसरामध्ये कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी आधुनिक यंत्राद्वारे कांदा लागवड करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे कांदा लागवडीचे काम अधिक सोपे झाले आहे.
पुरंदरच्या पूर्व भागांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतात. कांदा लागवडीसाठी शेतकरी आधुनिक यंत्रांचा वापर करू लागले आहेत. यंत्राद्वारे कांदा लागवड करण्यासाठी कमीत कमी दहा मजुरांची गरज भासते. तर यंत्राद्वारे एक एकर कांदा लावण्यासाठी 17 हजार रुपये खर्च येतो. तर एक एकर कांदा लावण्यासाठी मजुरांना 12 हजार रुपये द्यावे लागतात. मात्र कांदा लागवडीसाठी मजूरच मिळत नसल्यामुळे रोपे खराब होतात. त्यात शेतकऱ्याचे नुकसान होते. त्यामुळे आता शेतकरी जादा पैसे देऊन आधुनिक यंत्राद्वारे कांदा लागवड करू लागले आहेत.
यंत्राच्या माध्यमातून लावलेला कांदा चांगला आला, तर पुढच्या वर्षी नक्कीच यंत्राद्वारेच या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवडी केल्या जाणार आहेत. या दरम्यान पुरंदर तालुक्यात कारखाना नाही, तर या ठिकाणचा ऊस हा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला जात आहे. विद्यमान आमदारांचा साखर कारखाना हा अहमदनगर मध्ये आहे. प्रामुख्याने पुरंदर मध्येच साखर कारखाना झाला पाहिजे, ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे ऊस हा पुरंदरमध्ये वेळेवर जाईल, परंतु त्यासाठी कारखाना उभा राहणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कांदा देखील वेळेत होत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी गुऱ्हाळाला ऊस देणे पसंत केले.
अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड करेपर्यंत ऊस गेला नसल्यामुळे कांदा लागवड देखील रखडली आहे. परंतु आधुनिक यंत्रे आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे शेतकरी विलास खेसे व संदीप कड यांनी सांगितले.