लोणी काळभोर : निष्काळजीपणे व हयगयीने मशीन चालू केल्याने मिक्सर मशीनमध्ये साफसफाई करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वडकीनाला (ता. हवेली) येथील पालखी विसाव्याच्या समोर असलेल्या स्नुज हब कम्फर्ट अॅण्ड स्लिप रेडीफाईन्ड या कंपनीमध्ये रविवारी (ता.1) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मोहम्मद असरद अंसारी (वय 20, दोघेही रा. वडकीनाला, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर कैलाश भारत कोल (वय 21) हे जखमी झाले आहेत. तर अमित बल्लू धूर्वे ( वय व पत्ता माहिती नाही, वडकी नाला, ता.हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडकीनाला (ता. हवेली) येथील पालखी विसाव्याच्या समोर स्नुज हब कम्फर्ट अॅण्ड स्लिप रेडीफाईन्ड या नावाने कंपनी आहेत. या कंपनीत फिर्यादी कैलाश कोल व मोहम्मद अंसारी हे साफसफाई कामगार म्हणून काम करीत आहेत. तर आरोपी अमित धूर्वे हा याच कंपनीत मिक्सर मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत आहे.
फिर्यादी कैलाश कोल व त्यांचे मोहम्मद अंसारी रविवारी सकाळी कंपनीत फोम मिक्सर मशीनमध्ये उतरून साफसफाईचे काम नेहमीप्रमाणे करीत होते. साफसफाईचे काम सुरु असताना, मशीन ऑपरेटर अमित धूर्वे याने मशीनमध्ये कोणी इसम काम करीत आहेत? की नाहीत? हे न पाहता निष्काळजीपणे व हयगयीने मशीन चालु केली. त्यामध्ये फिर्यादी कैलाश कोल यांचा मशीनमध्ये पाय अडकुन दुखापत झाली.
दरम्यान, फिर्यादी कैलाश कोल यांच्यासोबत फोम मिक्सर मशीनमध्ये साफसफाईचे काम करणारे मोहम्मद असरद अंसारी हे मशीनमध्ये अडकले होते. त्यांच्या दोन्ही पायांना, शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कैलाश कोल यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिक्सर मशीन ऑपरेटर अमित धूर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.