पुणे : पुण्यातील एका हॉटेलमध्ये जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील डेक्कन परिसरातील क्रेझी सिझलर हॉटेलमध्ये हॉटेल मॅनेजर आणि ग्राहकात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी १५ ते २० जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या हॉटेलमध्ये एक कुटुंब मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. मात्र या ठिकाणी सेलिब्रेशनला फक्त मुलगी आणि आई अशा दोघांनाच परवानगी होती. या दरम्यान मुलीच्या पायाला लागल्याने तिच्या वडिलांनी हॉटेल चालकांना यासंबंधी जाब विचारला. यावरुनच दोघांमध्ये जोरदार बाचाबाची होऊन हाणामारी झाली. या घटनेबाबत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, पुण्यातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याचे नवे पोलिसायुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील कुख्यात गुंडांची ओळख परेड घेतली होती. यावेळी या गुंडांना छोटे, मोठे गुन्हे करायचे नाहीत, सोशल मीडियावर गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रिल्स टाकायचे नाहीत, असा सज्जड दम दिला होता. तरीही गुन्हेगारी थांबायची नाव घेईना.