पुणे : येथील मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणावर चार मित्र फिरायला गेले होते. त्यावेळी चौघेही पाण्यात उतरले. त्यादरम्यान चेष्टा मस्करी करताना चौंघाचा पाय एका खोल खड्ड्यात रुतला. तेव्हा आरडाओरडा केल्यावर स्थानिक लोकांनी तिघांना वाचवले. परंतु त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
जाधववाडी धरण परिसरात फिरायला गेलेल्या मुलांचा आवाज ऐकल्यावर स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिघांना वाचवले. मात्र अंगतकुमार लखन गुप्ता (वय-26, रा. कोथरुड, पुणे. मूळ. रा. अमृतसर, पंजाब) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला.
घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ टीम आणि NDRF च्या जवानांची टीम दहा मिनिटांत पोहचली. त्यांनी पानबोटींच्या सहाय्याने अंगतकुमार गुप्ताचा मृतदेह शोधून काढला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती व्यवस्थापन समिती, आपदा मित्र मावळ यांच्यासह शिवदुर्ग मित्र लोनावळाचे निलेश गराडे, अविनाश कार्ले, गणेश निसाळ, सर्जेस पाटील, अनिश गराडे, शुभम काकडे, सुरज शिंदे, विनय सावंत, गणेश गायकवाड, गणेश सोंडेकर, राजेंद्र बांडगे, कमल परदेशी, विक्रांत चौधरी, एनडीआरएफ, तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि ग्रामस्थांनी शोधकार्यात मदत केली.