पुणे : पुण्यामध्ये चोरीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अशातच आता तरुणाला अडवून त्याचा मोबाईल व गाडी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १४ सप्टेबर रोजी घडली होती. याप्रकरणी दोन आरोपींना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गेल्या महिनाभरात लोणीकंद पोलिसांनी ८ गावठी पिस्तुले आणि २६ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. तसेच गुन्हे रोखण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे.
सचिन राजाराम ढोरे (वय-३८, रा. ढोरे वस्ती, केसनंद, ता. हवेली), मंथन दत्तात्रय धुमाळ (वय-२६, रा. साईनगर, खराडी, चंदननगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला अडवून त्याचा मोबाईल व गाडी चोरुन नेण्याचा प्रकार लोणीकंद परिसरात घडला आहे. या घटनेचा तपास सुरु असताना पोलीस नाईक स्वप्निल जाधव यांना २८ सप्टेंबरला पहाटे बातमीदारांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केसनंद येथील बांगर वस्ती येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे तसेच मारुती स्विप्ट कार असा ५ लाख २३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस अंमलदार संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे सांगर जगताप, शुभम चिनके, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, दिपक कोरे, सुधीर शिवले, विशाल गायकवाड, प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी केली आहे .