पुणे (Pune) येथे हडपसर भागात एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात भरधाव मोटारसायकलची धडक एका पादचाऱ्याला बसल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. 6 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता संजीवनी रुग्णालयाजवळ हा भीषण अपघात घडला होता. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. विठ्ठल दत्तू मर्ढेकर असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मर्ढेकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान, मृताच्या पत्नीने आरोपी विरुद्ध आता गुन्हा दाखल केला आहे.
मृत विठ्ठल दत्तू मर्ढेकर यांच्या पत्नी चंदा मर्ढेकर यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोटारसायकलस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो अद्याप फरार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक परवेझ शिकलागर या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीचा शोध सुरु आहे.