पुणे : राजगड तालुक्यातील पानशेत धरण येथील बॅक वॉटर परिसरातील कादवे गावच्या स्मशानभूमीजवळ एका व्यक्तीचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार (ता.02) दुपारी घडली आहे.
उत्तम रावजी पडवळ (वय-38, रा. कादवे, ता.राजवड, जि.पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूचे कारण अस्पष्ट असून त्या व्यक्तीचा पाण्यात पाय घसरुन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीसांनी आपत्ती व्यवस्थापन टीमला दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य संदीप सोळसकर, गणेश सपकाळ, वैभव भोसले, संजय चोरघे पाटील, तानाजी भोसले, आकाश सोळसकर, मनोज शिंदे, प्रतीक महामुनी, सुरज कवडे, सागर बावळे, यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन टीमने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून वेल्हे पोलीसांच्या ताब्यात दिला आहे. वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.