पुणे : खुनाच्या गुन्ह्यातील एका आरोपीला जन्मठेप तर दुसऱ्याला दीड वर्षाचा कारावासाची शिक्षा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश के.पी.नांदेडकर यांनी दिले आहेत. कचरु गणपत गवळी (वय-३१, रा.पापळवस्ती, बिबवेवाडी, पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. अश्विन विकास गवळी (वय-१९, रा. विघ्नहर्ता नगर आंबेगाव पठार कात्रज) याला जन्मठेपेची, तर रिझवान मोहम्मद अन्सारी (पुणे) याला दीड वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जुबेर अहमद चाँदसाहेब मुजावर यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्हा हा सन २०१८ साली घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बुधवार पेठ परिसरात कचरु गवळी व आरोपी यांच्यामध्ये ४ जून २०१८ मध्ये जोरदार भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी कचरु गवळी याच्या छातीत चाकू खुपसून खून केला होता. यानंतर मित्राच्या घरी जाऊन अपघात झाल्यामुळे शर्टला रक्त लागले आहे. अशी बतावणी करून मित्राचा शर्ट परिधान केला. आणि रक्ताने माखलेला शर्ट निर्जनस्थळी स्थळी जाऊन पुरावा नष्ट करण्यासाठी जाळून टाकला.
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. यामधील एका आरोपीला याआगोदरच शिक्षा लागली होती. तर एक आरोपी मयत आहे. या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपी अश्विन गवळी व रिझवान अन्सारी यांचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता.
या खटल्यात वकील मारुती वाडेकर यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अश्विन गवळी याला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा तसेच दिड वर्षे साधी कैद व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, त्यानंतर १ हजार दंड, दंड न भरल्यास 8 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तर आरोपी रिझवान अन्सारी याला दिड वर्षे साधी कैद व रुपये ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा केली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.पी.नांदेडकर यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात वकील मारुती वाडेकर यांना पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर अहमद चाँदसाहेब मुजावर, सहाय्यक फौजदार प्रमोद धिमधिमे, पोलीस हवालदार सुहास डोंगरे यांची मदत मिळाली.