पिंपळवंडी: पिंपरीपेंढार येथे बिबट्याने महिलेवर हल्ला करुन ठार केले होते. या घटनेनंतर वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठिक ठकाणी पिंजरे लावले होते. यापूर्वी एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले होते. त्यानंतर बुधवारी (दि.१६) सकाळी पुन्हा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. पिंपरीपेंढार येथील पीरपट शिवारात बुधवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास सुनाता रवींद्र डेरे (वय ४२) यांच्यावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले होते.
या घटनेनंतर वनखात्याने बिबट्यांना पकडण्यासाठी तात्काळ मोहिम हाती घेतली होती. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात आठ, तर पिंपरीपेंढार शिवारात २२ असे एकूण ३० पिंजरे लावण्यात आले होते. तसेच बिबट्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळ्याच्या आजूबाजूला १५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी सुमारे शंभर वनकर्मचारी तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, शुक्रवारी ( दि. ११) पहाटेच्या सुमारास घटनास्थळापासून पाचशे फूट अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात सहा वर्ष वयाच्या नर जातीच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी घटनास्थळापासून सुमारे चारशे फूट अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात पाच वर्ष वयाचा नर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. सदर पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येधील बिबट्या निवारण केंद्रात हलविण्यात आले असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.