ओतूर : प्रतिमहा येणारे घरगुती वीज बिल वेळच्या वेळी ऑनलाइन पद्धतीने भरणाऱ्या वीज ग्राहकालाच या महिन्याचे बिल चक्क लाखात आल्याने वीजग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खामुंडी (ता. जुन्नर) हद्दीतील बेंडाडपट शिवारातील शेतकरी विठ्ठल सावळेराम नलावडे यांनी घरगुती येणारी वीज बिले ऑनलाइन पद्धतीने भरलेली आहेत. तरी देखील त्यांना महिन्याचे वीज बिल १ लाख २ हजार ५१० रुपये एवढे आल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अव्वाच्या सव्वा वीज बिले नागरिकांना येत असल्याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा बिले बनवण्याचा कारभार चव्हाट्यावर येऊन ओतूर, खामुंडी परिसरातून संताप व्यक्त होत आहे.
वीजग्राहक नलावडे यांना आलेले वीज बिल तत्काळ भरण्यात यावे, म्हणून वीज वितरण कंपनीकडून वारंवार मोबाईलवरून फोन केला जात आहे. यामुळे नलावडे यांना मोठा धक्का बसला आहे. नलावडे यांनी स्थानिक वायरमन पंकज जुनघरे यांना बिलाबाबत विचारणा केली असता हे काम माझे नसून कार्यालयातील साहेबांच्या हातात आहे, असे उत्तर दिले आहे.