लोणी काळभोर, (पुणे): कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना एकाला चक्कर आल्याची घटना शुक्रवारी (ता. २) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर रुग्णाला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लक्ष्मण ज्ञानोबा सावंत (वय-५८, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अविनाश लक्ष्मण सावंत (वय-३०) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश सावंत हे कुटुंबासोबत कुंजीरवाडीमध्ये राहतात. ते प्लॉटिंगचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामावर वडील लक्ष्मण सावंत हे पाणी मारत असायचे. दरम्यान, शुक्रवारी (ता.२) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वडील बांधकामावर पाणी मारत असताना, त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली बसले.
त्यानंतर लक्ष्मण सावंत यांना कुंजीरवाडी येथील मराठे हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, लक्ष्मण सावंत यांच्यावर उपचार सुरु असताना, त्यांना उपचारादरम्यान, अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. असे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. अशी खबर अविनाश सावंत यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.