पुणे : पुणे-नगर रस्त्यावरून एक अपघाताची घटना समोर आली आहे. नगर रस्त्यावर टँकरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वारासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांगले यांनी याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजेंद्र तुकाराम बोंडे (४६, रा. गणेशननगर, वडगाव शेरी) असं मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. तर या अपघातात दुचाकीस्वार सुनील किसन मांगले (४२, रा. अष्टविनायक सोसायटी, वडगाव शेरी), सूरज सदाशिव पाटील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीवरून तिघेजण नगर रस्त्याने निघाले होते. वाघोली-केसनंद रस्त्यावर कोणार्क ऑर्चिड सोसायटीसमोर अचानक पादचारी व्यक्ती आडवा आला. पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराने जाग्यावर ब्रेक दाबला. यामुळे दुचाकी घसरली आणि तिघेजण रस्त्यात पडले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या टँकरने मांगले, बोंडे, पाटील यांना जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बोंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस कर्मचारी कर्णेवर अधिक तपास करत आहेत.