नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे नीरा-बारामती मार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागेवरच मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले. सोमवारी (दि. २२) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखलं करण्यात आला नाही.
बंटी सुरेश गमंडे (वय ३५, रा. आनंदनगर, निंबूत) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर, तुकाराम सुखदेव माने, तेजस राहुल शिंदे, इरफान आरिफ सय्यद (सर्व रा. निंबूत, ता. बारामती) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नीरा- बारामती रस्त्यावरील बुवासाहेब ओढ्यावरील पुलाजवळील बुवासाहेब मंदिरासमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या घटनेमध्ये बंटी गमंडे याचा जागीच मृत्यू झाला, तर तुकाराम माने, तेजस शिंदे आणि इरफान सय्यद हे तिघे जखमी झाले. अपघातानंतर नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सहायक फौजदार संदीप मोकाशी आणि सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता पाठविले व वाहतूक सुरळीत केली. याबाबत अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.