पुणे : संपूर्ण देशपातळीवर कार्यरत असलेली ‘सहकार भारती’ या संस्थेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असतात. असाच एक पुणे विभाग साखर कारखाना प्रकोष्ठच्या वतीने सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व कार्यकारी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी/सरव्यवस्थापक यांच्यासाठी शनिवार (दि. २४) साखर संकुल शिवाजी नगर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये साखर कारखान्यांचे आर्थिक सक्षमीकरण- धोरण या विषयावर माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, यशदा पुणे व साखर कारखान्यांचे व्यावसायिक व्यवस्थापन या विषयावर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मंगेश तिटकारे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर मुक्त संवाद होणार आहे.
ज्या साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे वतीने पारितोषिके मिळाली आहेत. त्यांचा सन्मान महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व साखर आयुक्त कुणाल खेमनार यांचे हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी दिली.
या कार्यशाळेस जास्तीत जास्त प्रतिनिधींनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे पुणे महानगर व जिल्हा साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर यांनी केले आहे. उपस्थित प्रतिनिधींना संस्थेचे वतीने शासन मान्य प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे पुणे महानगर अध्यक्ष सी.ए.दिनेश गांधी यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश सह कोष औदुंबर नाईक उपस्थित होते.