जुन्नर : बिबट्याने आई वडीलांमध्ये झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेवून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथील पाटील मळा वस्ती परिसरात गुरुवारी (ता. ११) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शासन व वन विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
संस्कृती संजय कोळेकर (वय-दीड वर्ष) असे या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेंढपाळ संजय कोळेकर यांनी शिरोली खुर्द येथील शेतकरी संपत केरू मोरे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा लावला होता. बुधवारी (ता.१०) रात्री जेवण झाल्यावर संपूर्ण कुटुंब त्याच शेतात झोपले होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आईच्या शेजारी गोधडीत झोपी गेलेल्या संस्कृतीला बिबट्याने अलगद उचलून बाजूच्या अर्धा किलोमिटर अंतरावरील ऊसाच्या शेतात घेऊन गेला.
ही बाब लक्षात येताच मेंढपाळाने आरडाओरडा करून स्थानिक नागरिकांना कळवले. गावातील व परिसरातील नागरिकही मोठया संख्येने जमले. त्यांनी आजूबाजूच्या शेतात मुलीचा शोध घेतला. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला असता बिबट्या ऊसाच्या शेतातून इकडून तिकडे पळाला असल्याचे निदर्शनास आले. तसेच एका शेतात जवळ मुलीच्या डोक्यातील टोपडे व फ्रॉक आढळून आला.
या घटनेची माहिती वन विभागाला प्राप्त झाल्याबरोबर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमने शोध घेतला असता सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिमुरडीच्या मृतदेहाचे काही अवशेष सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या शेताच्या बांधावर आढळून आले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जुन्नरचे आमदार अतुल बेनके, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्राप्त अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
या घटनेमुळे वन विभाग व शासनाच्या विरोधात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वन विभाग बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करणार आहे की नाही? बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी कधी करणार? पकडलेले बिबटे अभय अरण्यात का सोडत नाही? वन विभाग किती बालकांचा बळी घेणार? असा सवाल लोक करीत असून वन विभाग जर बिबट्यांचा बंदोबस्त करणार नसेल, तर शेतकरी स्वतः कायदा हातात घेऊन बिबटयाचा चोख बंदोबस्त करतील.
वसंत मोरे (शेतकरी – शिरोली खुर्द. ता. जुन्नर)