गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील गलांडवाडीत दीड एकर उसाचे पीक जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. सुमारे पंधरा महिने स्वतः च्या लहान लेकराप्रमाणे उसाची मशागत केली. दिवसरात्र राबून उभे केलेले पीक आगीच्या कचाट्यात सापडून भस्मसात होताना शेतकऱ्याला उघड्या डोळ्यांनी पहावे लागत आहे. असा प्रकार गलांडवाडी, ता. दौंड येथील दिपक बबनराव ताकवले यांच्या मालकीचा गट नंबर 341 मधील शेतात घडला.
शुक्रवार दि २९ रोजी दुपारी ३ च्या सुमारास तोडणीला आलेल्या ऊसाला आग लागली. महावितरणची मेन लाईन सदर उसावरून गेली होती. त्या मेन लाईनचे नजीक पिंपळाच्या झाडाची फांदीचे घर्षण तारेला होत होते. दुपारच्या वेळी अचानक ठिणग्या पडून सदर ऊस अवघ्या काही मिनिटात जळून खाक झाला.
या उसामध्ये शेतकऱ्यांनी केलेले ड्रीप लाईन व सब लाईन पाईप जळून खाक झाले. यामुळे ताकवले यांना आपल्या पिकासोबतच अनेक शेती उपयोगी वस्तूंच्याही नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्याचे तब्बल सुमारे चार लाख ते पाच लाखाच्या दरम्यान एकूण नुकसान झाले. परिसरातील ग्रामस्थांनी आग रोखण्याचा प्रयत्न केला पण आगीच्या झळा खूप मोठ्या होत्या. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या उसाव्यतिरिक्त शेजारी इतर मोठे पीक नव्हते. नाहीतर या पेक्षाही खूप मोठे नुकसान झाले असते. घटनास्थळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता पारगाव रोहित तरटे, वायरमन सुभाष शेळके, सहाय्यक नारायण साखरकर यांनी तात्काळ धाव घेतली. व महसूल अधिकारी देखील उपस्थीत राहून पंचनामा केला आहे.
दौड शुगर व श्रीनाथ म्हसोबा प्रशासनाशी संपर्क साधून या जळीत शेत्रातील ऊस लवकरात लवकर तोडावा अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने केली आहे.महसूल खाते व महावितरण कडून देखील लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी .
उत्तम ताकवले – मा. सरपंच गलांडवडी (दौंड)