पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. उसने घेतलेले पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलावून घेत तरुणासोबत वाद घातला. तसेच शिवीगाळ करुन चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार कोथरूड परिसरात उघडकीला आला आहे.
कोथरूडमधील महेश विद्यालयासमोर असलेल्या रोडवर मंगळवारी (ता. २७) दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत राहुल दशरथ जाधव (वय-२९, रा. उबरे ता. भोर) याने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी द्रौपदी काशीनाथ तेलोरे (वय-३३, रा. सागर कॉलनी, कोथरुड) हिच्यावर गुन्हा दाखल करुन सीआरपीसी नुसार नोटीस देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी राहुल याच्याकडून ८६ हजार रुपये उसने घेतले होते. तुझे पैसे परत देते असे म्हणून आरोपी महिलेने राहुल याला बोलावून घेतले. पैसे घेण्यासाठी आल्यानंतर महिलेने त्याच्यासोबद वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करुन चाकूने पाठीवर व मानेखाली वार करुन जखमी केले.