-बापू मुळीक
सासवड : लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गावचे सुपुत्र, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे निमंत्रित सदस्य लोकनेते स्वर्गीय शिवाजीआप्पा पोमण मित्र परिवाराच्या वतीने सासवड येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे हे सलग 21 वे वर्ष आहे.
या शिबिरास उपस्थित राहून अनेक मान्यवर रक्तदान करतात. एखादा उपक्रम सुरू करणे सोपे आहे. परंतु तो अखंडपणे चालवणे कठीण गोष्ट असते. स्वर्गीय शिवाजीआप्पा पोमण यांच्या अकाली निधनानंतरही त्यांच्या जिवलग मित्रपरिवाराने रक्तदानाचा हा उपक्रमरुपी यज्ञ अखंडपणे सुरू ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदनपर कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, पत्रकार, हॉटेल लोणकरवाडा डायरेक्टर, शिक्षकनेते सुनील लोणकर हे रक्तदान शिबिर सुरु झाल्यापासून सलगपणे रक्तदान करत आहेत. त्यांनी सोमवार (दि.16 डिसेंबर) रोजी सासवड येथे सलग 21 वेळा रक्तदान करून विक्रम नोंदवला. सुनील लोणकर हे महाविद्यालय जीवनापासून रक्तदान करत आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध रक्तदान शिबीरप्रसंगी 46 वेळा रक्तदान केले आहे.