पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरातील विविध संस्थांकडून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे अनुचित प्रकार रोखण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दीड हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील अतिरिक्त कुमक बंदोबस्तासाठी तैनात ठेवली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) दोन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात ठेवल्या आहेत. शहराच्या मध्य भागासह उपनगरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.
कात्रज येथील कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने कात्रज डेअरी प्रवेशद्वार क्रमांक तीन ते वसंत विहार सोसायटी ते अहिल्यादेवी उद्यान दरम्यान असलेला रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.