पुणे : बकरी ईद सणामुळे सोमवारी (१७ जून) सकाळी सहानंतर गोळीबार मैदान चौकातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानामध्ये मुस्लिम धर्मीय नागरीक मोठ्या संख्येने सामुहिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र येणार आहेत. त्यामुळे संबंधित परिसरामध्ये वाहनांची गर्दी होऊन वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी सोमवारी (१७ जून) सहा वाजल्यापासून ते नमाज पठण होईपर्यंत गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
असा असेल वाहतुकीत बदल
- गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्वप्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौक, उजवीकडे वळून गुलटेकडीमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
- सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. कोंढवा, लुल्लानगरमार्गे येणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, नेपीयर रस्ता, मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार, भैरोबा नाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
- शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक पर्याची मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी सॅलसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
- सोलापूर रस्त्याने गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा नेपीयर रस्तामार्गे, सीडीओ चौकातून इच्छितस्थळी जावे.
- सोलापूर रस्त्यावरील भैराेबानाला चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. या भागातील वाहतूक एम्प्रेस गार्डन आणि लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे. कोंढवा परिसरातून येणाऱ्या सर्व वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.