पुणे : यंदाचे वर्ष साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे १२५ वे म्हणजेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष महाराष्ट्र शासन आचार्य अत्रे यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे साजरं करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तथा अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. तर आयोजक म्हणून विकास खारगे, प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग तथा विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी जबाबदारी उचलली आहे.
या उपक्रमांतर्गत ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा अशोक हांडे लिखित व दिग्दर्शित कार्यक्रम मुंबईच्या ‘चौरंग’ या संस्थेतर्फे सादर केला जात आहे. आचार्य अत्रे कोण होते? त्यांची विद्वत्ता, वक्तृत्व, राजकीय कर्तृत्व, त्यांनी शालेय अभ्यासक्रमात आणलेले ‘नवनीत वाचनमाला’, पत्रकार आणि संपादक म्हणून त्यांचे योगदान, नाटक आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली देदीप्यमान कामगिरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी निभावलेली ऊतुंग भूमिका.
हे सर्व नव्या पिढीला कळलं पाहिजे या तळमळीतून लेखक, दिग्दर्शक, गायक, निवेदक अशोक हांडे व त्यांचे चौरंगचे ५० कलाकार हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार पद्धतीने सादर करतात. या कार्यक्रमासाठी अशोक हांडे यांना आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि आचार्य अत्रे यांचे नातू ॲडव्होकेट राजेंद्र पै यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून संगीत संयोजन महेश खानोलकर यांचे आहे.
सदर अत्रे अत्रे सर्वत्रे चा प्रयोग हा प्रेक्षकांसाठी संपूर्णपणे विनामूल्य आहे. अत्रे अत्रे सर्वत्रे या कार्यक्रमाचा प्रयोग सोमवार दिनांक १२ ऑगस्ट सायंकाळी ७ वाजता आचार्य अत्रे सांस्कृतिक केंद्र, सासवड येथे होणार आहे. अशी माहिती लेखक,दिग्दर्शक अशोक हांडे यांनी दिली.