पुणे : मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर पुण्यातील रस्ते, पादचारी मार्ग, दुभाजक, घाट, धार्मिक स्थळे येथे सर्वंकष स्वच्छता केली जाणार आहे. येत्या आठवड्याभरात महापालिकेच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन ही स्वच्छता करावी, पुण्यामध्ये बदल झालेला दिसला पाहिजे, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिकेला दिले आहेत.
राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, शहरी आणि ग्रामीण भागातील डीप क्लीनिंग मोहीम आणि महिला सशक्तीकरण अभियान याविषयीची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. या बैठकीला पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे उपायुक्त ऑनलाइन सहभागी झाले होते.
अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शहरात मोठी स्वच्छता मोहीम राबवली. प्रमुख १५ रस्ते, महत्त्वाचे चौक या ठिकाणीही स्वच्छता केली जाईल. रस्ते, पदपथ, दुभाजकावर पाण्याचा फवारा मारून ते स्वच्छ केले जातील. रस्त्यावरील कचरा, माती, वाळू, खडी काढली जाईल. अनधिकृत फलक, होर्डिंग काढले जातील. यामध्ये एकाचवेळी अनेक विभागाचे कर्मचारी काम करणार आहेत.
अशी राबविली जाणार माेहीम
- डीप क्लीनिंग मोहिमेत शहरातील धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रांच्या परिसरात व्यापक स्वच्छता
- शहरातील आदर्श रस्ते योजनेत निवडलेले प्रमुख १५ रस्ते, महत्त्वाचे चौक या ठिकाणीही केली जाणार स्वच्छ
- पाण्याच्या उच्च दाबाच्या फवाऱ्याने धुतले जाणार रस्ते, पदपथ आणि दुभाजक
- रस्त्यावरील कचरा, माती हटविण्याबाबत दिला जाणार भर
- अनधिकृत फलक, होर्डिंग काढले जातील
- गरजेनुसार एकाच वेळी सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी राबवून स्वच्छता केली जाणार