पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार आदित्य उर्फ सोन्या बंडु कांबळे (वय-20 रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
आदित्य कांबळे हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह भारती विद्यापीठ, येरवडा व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार यासारख्या हत्यारासह जबरी चोरी, अपहरण, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या पाच वर्षात त्याच्यावर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास समोर येत नव्हते.
आदित्य कांबळे याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आदित्य कांबळे याला एमपीडीए कायद्यान्वये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखा, पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.