पुणे: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार गणेश उर्फ भावड्या बाबु ओव्हाळ (वय-24 रा. जय शिवाजी चौक, आंबेगाव बुद्रुक, पुणे) याच्यावर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
गणेश ओव्हाळ हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता यासारख्या हत्यारासह खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या दोन वर्षात त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.
गणेश ओव्हाळ याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी गणेश ओव्हाळ याला नागपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखा, पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.