पुणे: वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार अमन अझीम शेख (वय-22 रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायदाखाली स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
अमन शेख हा वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, चाकू, तलवार यासारख्या हत्यारासह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या तीन वर्षात त्याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच अमन शेख याच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास समोर येत नव्हते.
अमन शेख याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन आयुक्त रितेश कुमार यांनी अमन शेख याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे शाखा पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.