पुणे : दिवाळी हा भारतातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण असून अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक साहित्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे महिन्यांचे बजेट कोलमडून लाडक्या बहिणींची फोडणी महाग झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरू करून सर्वसामान्य महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची मदत सुरू केली आहे.
या योजनेचे सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले असून महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र, दुसरीकडे महागाई वाढल्याने लाडक्या बहिणींचे महिन्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली जात आहे. लाडकी बहीण योजना सुरू होण्यापूवी खाद्यतेलाचा १४ किलोचा एक डबा १६०० रुपयाला मिळत होता.
मात्र, दिवाळी सणाला काही दिवस बाकी आहे तोच हा डबा तब्बल २२०० रुपयाला मिळत आहे. तसेच हरबरा डाळ पूर्वी ७० रुपये किलो होती, ती आता १०० रुपयांना मिळत आहे. खोबरेही १२० रुपयांवरून २३० रुपये किलो इतके महाग झाले आहे. रवा ३५ रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत पोहोचला असून बेसन ८० रुपयांवरून ११० रुपयांपर्यंत वाढले आहे.
त्यामुळे महिलांचे महिन्यांचे आर्थकि बजेट कोलमडले आहे. शासनाच्या दर महिन्याच्या मदतीमुळे लाडक्या बहिणी खुश असल्या तरी दुसरीकडे मात्र दाजींच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.