-सागर जगदाळे
भिगवण : पुणे प्राईम न्यूज या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या गतिरोधकाच्या मागणीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आज तक्रारवाडी येथील चौकात भिगवन राशीन रस्त्यावरती गतिरोधकाची असणारी आवश्यकता लक्षात घेऊन आज गतिरोधक बनविले आहेत. या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना मोठी तारेवरची कसरत करून रस्ता ओलांडावा लागत होता व भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडू नये, म्हणून याबाबतचे गतिरोधकांविषयीची मागणी असणारे वृत्त (दि. 4 ऑगस्ट) रोजी पुणे प्राईमच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत भिगवण-राशीन महामार्गावर दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्याचे काम करण्यात आलेले आहे. याबद्दल समस्त तक्रारवाडी व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी पुणे प्राईम न्यूजचे आभार मानले.
गतिरोधक बनविले पण गतिरोधकच्या उंचीत अनियमितता
सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गतिरोधकाची आवश्यकता लक्षात घेऊन तातडीने गतिरोधक बनविण्याचे काम हाती घेतले परंतु रस्त्यावरती बनवण्यात आलेले राशीनकडून भिगवन कडे जाणाऱ्या लेनवरचे गतिरोधक हे सर्वसाधारणपणे बनवलेले आहेत. अगदी छोटीशी पट्टी मारावी त्याप्रमाणे हे गतिरोधक बनवले असून सहज गाड्या त्याच्यावरून जात असल्यामुळे या गतिरोधकांचा सरकारी नियमाप्रमाणे कितपत योग्यता आहे हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी जागेवरती येऊन पाहणे गरजेचे आहे नाहीतर दुरून डोंगर साजरे अशी अवस्था व्हायला नको, त्याबाबत अधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य तो बदल गतिरोधकांमध्ये करावा. या गतिरोधकावरून वाहन अगदी कुठल्याही प्रकारचा वेग कमी न करता सहजपणे जात आहे. त्यामुळे बनवलेल्या गतिरोधकाची उंची ही नियमाप्रमाणे नसून एक प्रकारे ग्रामस्थांच्या मागणीची केलेली ही क्रूर चेष्टा आहे किंवा नुसते तोंडाला पाणी पुसण्याचे काम यातून करण्यात आलेले आहे. या गतिरोधकाच्या उंचीची लवकरात लवकर त्यांनी योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काय आहेत नियम?
गतिरोधक उभारण्यासाठी इंडियन रोड काँग्रेसकडून निकषांची अंमलबजावणी आवश्यक आहे. गतिरोधक कसा उभारावा, एकाच रस्त्यावर दोन गतिरोधक उभारताना त्यात किती अंतर असले पाहिजे, त्यांची उंची किती असावी, याबाबत निकष ठरवले गेले आहेत. गतिरोधक उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेन्ट पट्ट्या, पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे. शिवाय वाहनचालकांना सूचना मिळण्यासाठी गतिरोधक येण्याआधी 40 मीटर अंतरावर सूचना फलकही रस्त्यावर असणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा निकष आहे. गतिरोधक उभारताना या गतिरोधकांची उंची अडीच ते दहा सेंटिमीटरपर्यंत, लांबी 3.5 सेंटिमीटर, वर्तुळकार क्षेत्र 17 मीटर असायला हवे.
गतिरोधक किमान दोन ते तीन फुटांचा स्लोप गतिरोधकाला असावा. शाळा, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे अशा ठिकाणी गतिरोधक केला जातो. महामार्ग, राज्य मार्गावर पांढरे पट्टे असलेले दिशादर्शक गतिरोधक असावेत. याखेरीज तयार केलेले कुठलेही गतिरोधक अनधिकृत व धोकादायक असतात.