अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिरूर येथील डॉक्टरांच्या विविध संघटनेच्या वतीने वैद्यकीय व्यवसाय बंद ठेऊन निषेध महामोर्चा काढला. या मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नीमा मेडिकल संघटना, होमिओपॅथी डॉक्टर्स संघटना, डेंटिस्ट डॉक्टर्स संघटना, केमिस्ट संघटना आणि लॅब संघटना सहभागी होऊन आज बंद पुकारण्यात आला.
तसेच इंदिरा गांधी पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिरूर शहरातील विविध पक्षांचे व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिरूर नायब तहसिलदार स्नेहा गिरगोसावी व पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांना निवेदन देण्यात आले.
तहसिल कार्यलयासमोर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. मोर्चात इंडियन मेडिकल असोसिशन शिरुरचे अध्यक्ष डॉ. राहुलदत्त पाटील व सचिव डॉ. स्वप्नील भालेकर, होमिओपॅथी संघटनेचे बाबा शिंदे, फार्मसी संघटनेचे बाबाजी गलांडे, पॅथालॉजिकल संघटनेचे उदय शिंदे, शिरुर वकील संघटनेचे अध्यक्ष अमित खेडकर, डॉ. अशोक साबळे, यांनी लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, माजी नगरसेवक विनोद भालेराव तसेच मोठया प्रमाणात वैद्यकीय व्यवसाय व त्याच्याशी संलग्न असणारे सर्व महिला नर्सेस, ब्रदर, लॅब, कर्मचारी, फार्मासिस्ट, विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या निवेदनात म्हटले आहे की, ९ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकत्ता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या अत्यंत निंदनीय घटनेमुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या घटनेत एका डॉक्टर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतरच्या काळात या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणे वागणूक देत तपासातही निष्काळजीपणा दाखविला.
तसेच स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आणि रुग्णालयातील विविध विभागांची तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने १७ ऑगस्ट २०२४ रोजी निषेध दिन पाळून सकाळी ६ वाजेपासून १८ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बंदमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. परंतु नियमित ओपीडी आणि तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. या माध्यमातून वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी न्याय मागण्यांची पुर्तता करण्याचा ते प्रयत्न करत आहेत.