अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : म्हाडाच्या माध्यमातून शिरुर शहरात गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे दर्जेदार घरे बांधून शहराच्या वैभवात भर घालण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरूर शहरात अत्यल्प उत्पन्न गटांसाठी कमी किमंतीत सदनिका उपलब्ध होणार आहे.
याबाबतची माहिती सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध व्हावी याकरिता शिरूर नगरपरिषदेची जुनी इमारत येथे पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
यावेळी म्हाडाचे मुख्य आधिकारी अशोक पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश वाबळे, गटविकास आधिकारी महेश डोके, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, उपअभियंता शुभांगी पतंगे, कनिष्ठ अभियंता पूजा ढमढेरे, सहाय्यक अभियंता प्रफुल्ल लोखंडे, सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी राहुल नवले, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, शिवसेनेचे नेते अनिल काशीद, बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी सभापती संतोष शितोळे, शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात, राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार, तर्डोबावाडीचे सरपंच जगदीश पाचर्णे, माजी नगरसेवक विठ्ठल पवार, माजी सभापती जयवंत साळुंखे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील शिरुर ही महत्वाची बाजारपेठ असून दोन जिल्ह्याचा सीमेवर हे शहर आहे. शिरुरची लोकसंख्या वाढत असून परिसरात औद्योगिकीकरणाचा वेग वाढलेला आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून शासन कटिबध्द आहे. आगामी काळात शिरुर शहरातील पुणे-नगर बायपास रस्त्यावर फार्मसी कॉलेज म्हाडाच्या जागेत ४०० ते ५०० घरे बांधून शिरुर शहराच्या वैभवात भर घालणार असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.
शिरूर शहरात पुणे-नगर हायवे लगत शिरूर बस स्थानकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ७० सदनिका व ८ गाळे असलेल्या प्रकल्पाचे काम पुणे म्हाडाच्या माध्यमातून लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या घरांबाबत आवश्यक प्रक्रियेची तसेच प्रधानमंत्री आवास योजनेबाबतची माहिती सर्वसामान्यांना सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी याकरता पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नागरिकांसाठी माहिती केंद्राची स्थापना करावी, असे आदेश म्हाडा प्रशासनाला दिले आहेत.
त्यानुसार म्हाडा प्रशासनाकडून माहिती केंद्राची स्थापना करण्यात आली असून सदर प्रकल्पास मुख्याधिकारी शिरुर नगरपरिषद यांची सुधारित मान्यता प्राप्त होऊन प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत 60 टक्के काम पूर्ण झालेला हा प्रकल्प डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे पुणे म्हाडाचे नियोजन आहे.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूरी प्राप्त अत्यल्प उत्पन्न गट सदनिकांची विक्री करिता उपलब्ध असुन क्षेत्रफळ ३३०.०० चौ. फुट, बांधकाम क्षेत्रफळ ४२७ ते ४३५ चौ. फुट आहे. तसेच या सदनिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त होऊन त्याचा लाभ सदनिका धारकांना होणार आहे. सदर प्रकल्पास मुबलक पार्किंग सुविधा, सौर उर्जेवरील दिवे, अत्याधुनिक सोयी सुविधेनसोबतच योजने लगत शाळा, बँक, हॉस्पीटलची व्यवस्था असल्याने रहिवाशांना त्याचा लाभ होणार असल्याचे म्हाडाच्या वतीने सांगण्यात आले आहे.