पुणे : घाऊक बाजारात दिवसेंदिवस जुन्या कांद्याची आवक घटत आहे. तर दुसरीकडे हलक्या प्रतीचा नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात जुन्या कांद्याचे दर ८० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. हे दर सुमारे महिनाभर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
मार्केटयार्डातील घाऊक बाजारात जुन्या कांद्याला प्रतिकिलोला ५५ ते ६५ रुपये दर मिळत आहे. तर नवीन कांद्याला ३० ते ४५ रुपये दर मिळत आहे. पुणे विभागातील कांद्याला दक्षिण भारतातून कायम मागणी असते. सद्यःस्थितीतही दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू येथून कांद्याला मागणी होत आहे. दक्षिण भारतासह पुणे शहर आणि परिसरातूनही कांद्याला मागणी आहे. मध्य प्रदेशात मात्र लोकलचा कांदा असल्याने तेथून मागणी थांबली आहे. बाजारात दाखल होणाऱ्या जुन्या कांद्याचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरात वाढ झाली आहे.
बाजारात १० ते १५ ट्रक जुन्या कांद्याची, तर ३० ते ३५ ट्रक नवीन कांद्याची आवक होत आहे. नवीन कांद्याची आवक श्रीगोंदा, कर्जत, जामखेड येथून होत आहे. तर जुन्या कांद्याची आवक जुन्नर, मंचर, खेड, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यांतून होत आहे. जोपर्यंत चांगल्या प्रतीच्या नवीन कांद्याची बाजारात आवक वाढणार नाही, तोपर्यंत हे दर स्थिर राहतील. आवक वाढल्यानंतर जुन्या कांद्याच्या दरात घट होईल, अशी माहिती मार्केटयार्डातील कांदा व्यापाऱ्यांनी दिली.