जुन्नर (पुणे): सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी बँकेत गेलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे पैसे बँकेतून चोरी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखाराम विठ्ठल लांडे (वय- ७० वर्ष, धंदा- शेती रा. निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्यादी दिली असून ४५ हजार ५०० रूपये इतकी रक्कम चोरीला गेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी जनता सहकारी बँक, जुन्नर येथे गेले होते. तिथे त्यांनी सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी सोबत आणलेली रक्कम एक लाख पन्नास हजार पाचशे रुपये मोजून त्याप्रमाणे पैसे भरणा स्लिप बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून भरून घेत भरणा करण्याच्या रांगेत बसले. त्यानंतर तेथे दोन अनोळखी इसम येऊन थांबले व ते फिर्यादीस म्हणाले की, ‘आम्हाला तुमच्या नोटांचे नंबर बघायचे आहेत’. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या हातातील पैसे खाली फरशीवर पाडून त्यातील काही नोटा खिशात घालत चोरून नेल्या.
यामध्ये ५०० रूपयांच्या ९७ नोटा असे एकूण ४८ हजार ५०० रूपये चोरीला गेले आहेत. याप्रकरणी दोन अनोळखी इसमांविरुद्ध भा.द.वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार गीजरे करत आहेत.