दौंड : दौंडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका जुन्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये इमारतीचे लाकडी खांब, तुळया आणि माळवदपूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत इमारतीच्या दर्शनी भागात असलेल्या तीन दुकानांतील सामान देखील जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हार व फुल विक्रेत्याच्या सजावटीचे सामान, झेरॉक्स विक्रेत्याच्या दोन झेरॉक्स यंत्रे आणि एका लेडीज टेलरच्या दुकानाचे छत पूर्णपणे जळून खाली कोसळले आहे. तीन मे रोजी सकाळी साडेसहा ते साडेदहा वाजेपर्यंत चार तास पाण्याचा फवारा मारून अग्निशमन दलाने आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
दरम्यान आग लागलेली इमारत ही टिनवाला बिल्डिंग या नावाने ओळखली जाते. दौंडमधील शिवाजी महाराज चौकापासून जवळ असलेली ही इमारत सध्या मोडकळीस आल्याने या इमारतीतील रहिवासी अन्यत्र राहत आहेत. या इमारतीमध्ये कोणी राहत नसल्याने रात्री दुकाने बंद करून सर्व दुकानदार आपल्या घरी गेले होते. इमारतीला आग लागल्याचे शेजारील इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लक्षात आल्याने त्यांनी लागलीच अग्निशामक यंत्रणांशी संपर्क साधला.