पुणे : २० फेब्रुवारीपासून पुणे आणि चिंचवडमधील कॅब चालकांचे काम बंद आंदोलन सुरु होणार आहे. यामुळे ओला, उबरची सेवा येत्या २० फेब्रुवारीपासून बंद राहणार आहे. या निर्णयामुळं शहरातील प्रवशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅब चालकांकडून पुण्यातील आरटीओ ऑफिस येथे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा चालकांचा आरोप असल्यामुळे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जाहीर केले. १ जानेवारी २०२४ पासून नवीन दर लागू झाले आहेत. मात्र, ओला, उबेर यासारख्या कंपन्या प्रत्यक्षात त्या दराची अद्याप अंमलबजावणी करत नाही. यामुळे याचा फटका कॅब चालकांना बसत आहे.
नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल. या भीतीने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अद्याप दराची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संगम ब्रिज जवळ आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालक एकत्रित येणार असून निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात सुमारे २० हजार कॅब चालक सहभागी होणार असल्याचा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे.