-राहुलकुमार अवचट
यवत : देशाचे माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे सदाभाऊ खोत यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्षा डॉ. वंदना मोहिते, राहुल गांधी विचार मंचाचे पुणे जिल्हाध्यक्ष अरविंद दोरगे व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली असून याबाबतचे निवेदन यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना देण्यात आले.
भाजपचे विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले असून खोत यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत तर राजकीय नेत्यांनीही सदाभाऊंचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे अखेर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली.
शरद पवार हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या पातळीवरील केलेली टीका महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करू शकत नाही आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती देखील नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरद पवार गट) डॉक्टर सेलच्या अध्यक्षा वंदना मोहिते यांनी म्हटले .
सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा मोहिते यांनी जाहीर निषेध नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्या. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल सदाभाऊ खोत यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदन प्रसंगी डॉक्टर सेलचे अध्यक्षा डॉ . वंदना मोहिते, पंचायत समितीचे माजी सदस्य कुंडलिक खुटवड, काँग्रेसचे अरविंद दोरगे, विठ्ठल दोरगे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दत्ता डाडर, मंगेश रायकर , रामदास दोरगे, राजु शेख यांसह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
राजकारणात मतमतांतरे असतात त्याप्रमाणे टीका टिप्पणी देखील होत असते. परंतु त्या टीका टिप्पणीला विशिष्ट मर्यादा आहेत. या मर्यादा पार करण्याची आपल्या सुसंकृत महाराष्ट्र राज्याची संस्कृती अजिबात नाही. त्यामुळे कुणावरही टीका टिप्पणी करतांना आपण कुणावर बोलतो व काय बोलतो याची खातरजमा करून आपण आपली राजकीय पातळी ओळखली पाहिजे.
राज्यातीलच नव्हे देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांची देशाच्या राजकारणात वेगळी उंची आहे. त्यांच्याबाबत प्रत्येक पक्षातील वरिष्ठ नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करतांना मुद्देसूद टीका करीत आले आहे. जाहीर सभेत बोलतांना भान राखून बोलले पाहिजे. आपल्या राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा जपतांना कुणावरही टीका करतांना आपली वैचारिक पातळी जपणे अत्यंत गरजेचे आहे. दौंड तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अनेक वर्षाचे राजकीय समीकरण पाहता मात्र सदाभाऊ खोत यांच्या विधानामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता असल्याची चर्चा दौंड तालुक्यात सुरू आहे